“ए आय दिंडीतल्या लोकांनी आपलं डोकं लावू नका“ आकांक्षा माऊलीचा असा खडा आवाज ऐकून माझा प्रवास सुरु झाला. आमची बस फलटणला थोडी लवकर पोहचली होती. सगळे माऊली उतरून पुढे चालू लागले होते आणि मी माझ्या मित्रासाठी मागे थांबलो होतो. बाकी लोक ज्या दिशेनी गेले त्याच बाजूला मी उभा होतो. पण आकांक्षा माऊली त्यांच्या सोबत असणाऱ्या माऊलींना गावातून घेऊन जात होत्या. आणि त्या साठी हा आदेश होता.
मी पटकन त्यांच्या जवळ पळत जाऊन त्यांचा ग्रुप जॅाईन केला आणि मित्राला सांगत होतो की मी तिथे उभा होतो तेव्हड्यात आकांक्षा माऊली आल्या. वारकरी प्रथेप्रमाणे “राम कृष्ण हरी” करून आम्ही चालू लागलो.
माऊलींची लीला अगाध आहे! आम्ही जसे पुढे चालत होतो तसे तुळशी पाने आणि फुले विकणारे विक्रेते दिसू लागले. आनंद माऊली सगळ्यांना एकत्र राहायला सांगत होते. तेवढ्यात खूप गर्दी दिसू लागली. पहातो तर समोर प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींचा रथ! “आजी मी ब्रम्ह पाहिले!”….
दर्शन ईतके सुरेख झाले की कायम स्मरणात राहील!
आकांक्षा माऊलींना कदाचित संकेत मिळाले असतील की ह्या मार्गाने गेल्यावर दर्शन होईल आणि त्या आम्हा शेवटी उरलेल्या सगळ्यांना घेऊन या मार्गाने आल्या. सगळीच माऊलींची कृपा! आकांक्षा माऊलींचे कितीही आभार मानले तरी कमीच आहेत.
मग पुढे काय! संपूर्ण टप्पा अत्यंत आनंददायी झाला.
ह्या वेळी फुगडीचे विविध प्रकार पाहायला मिळाले. "झेंडा" फुगडीत २ माऊली मध्ये झेंडा घेऊन फुगडी खेळतात. दुसरा प्रकार म्हणजे "पखवाज फुगडी" जी शक्यतो पुरुष माऊली पखवाज घेऊन खेळतात. "रिंगण फुगडीत" काही माऊली बसून तर काही उभे राहून रिंगण बनवून फुगडी घालतात.
मला आवडलेली नाचून खेळण्याची फुगडी ही पाहायला मिळाली. कुठलीही फुगडी झाली की सगळ्या माऊली एकमेकांना वाकून नमस्कार करतात ही प्रथा नम्रपणाने वागायची सवय लावते. शेवटी “सवय लागणे” फार महत्वाचे आहे! नाहीतर आपला अहंकार कायम आपल्या डोक्यावर नाचत असतो.
पुढे जेवणाच्या ठिकाणी पोहोचतो तेव्हड्यात पावसाने हजेरी लावली. पाच मिनिटात सगळीकडे चिखल. मग काय? ठेविले अनंते तैसेची रहावे.. ह्या वचना प्रमाणे ह्या विकट परिस्थितीतही २५ नंबरच्या दिंडीने गरम गरम जेवण दिले. प्रसादाचे जेवण कधीही खुप चविष्ट असते ह्याचा अनुभव आला.
जेवणं झाली आणि आम्ही थोडे विसावलो. पाऊस मधून आधून पडत होता पण दिंडीत मिळेल त्या कोरड्या जागी विसावा घेण्याची कला आम्हाला शिकायला मिळाली. कुठल्याही परिस्थितीत आनंदाने राहाणे हे इथे शिकलो.
मग दिंडीत गप्पा टप्पा आणि हशा. कोणी हैदराबादहून वारीला आलेले तर कुणी इंदोरहून. एक माऊली पूर्ण वारी आणि परतवारी पण करणार होत्या. त्यांना एवढी ताकद कुठून मिळते असे विचारल्यावर लगेच म्हणाल्या “मी कुठे चालते? माऊलीच बोट धरून घेऊन जातात. तेच प्रेरणा देतात आणि तेच संकल्प पूर्ण करून घेतात”
कायम लक्ष्यात ठेवावे असे वाक्य!
संध्याकाळी माऊलींचा रथ आमच्या जेवणाच्या ठिकाणी आला तेव्हा पुन्हा दर्शन घेतले पण सकाळच्या दर्शनाचा आनंदच काही वेगळा होता!
Comments